Sunday, February 9, 2014

Geography Dictates strategy

जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या "Military History of India" पुस्तकातील एका प्रकरणाचे शिर्षक - "Geography Dictates strategy" असं फार बोलकं दिलं आहे. १६७४ साली भारतात आलेला फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे चौलला उतरला, तिथुन गोवा मार्गे तो विजापुरला जाणार होता. प्रवासाच परवाना काढण्यासाठी तो मराठ्यांच्या कचेरीत गेला. बोलण्या्च्या ओघात तिथल्या अधिकार्‍याने शिवाजी महाराजांबाबत त्याला २ महत्वाच्या गोष्टि सांगितल्या ज्या त्याने टिपून ठेवल्या - १) महाराज सर्वात जास्त खर्च हेरखात्यावर करतात व त्या माहितीच्या जोरावरती मोहीम आखतात, २) महाराजांनी स्वत:च्या व शत्रूच्या प्रदेशातील भूगोलाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला असून गरज वाटेल त्या प्रदेशाचे ते नकाशे तयार करुन घेतात. ...... Geography Dictates strategy.

..... पण म्हणून दिसला उंच डोंगर की बांध दुर्ग, दिसली बरी जमिन की बांध गढी असं नसतं. त्या मागे प्रचंड अभ्यास असतो. शतकानुशकतं झिरपत आलेलं ज्ञान व तत्कालिन गरज यांचा विचार करुन दुर्ग बांधावे लागतात. दुर्गांच मुख्य काम म्हणजे संरक्षण. गावांना, बाजार पेठांना, मंदिरांना, बंदरांना, खाड्यांना, व्यापारी मार्गांना, राजधानीच्या संरक्षणासाठी तिच्या भोवती, राज्याच्या सीमांवरती अश्या ठिकाणी दुर्ग उभारावे लागतात. अनेकदा गावांभोवती अथवा बाजारपेठांभोवतीच भक्कम तट उभारले जातात. गावांभोवती असलेली संरक्षक तटबंदि अथवा खंदक अनेक ठिकाणी आजही दिसतात. मराठ्यांच्या भितीमुळे त्यावेळी कोलकत्याच्या व्यापार्‍यांनी इंग्रजांच्या मदतीने हजारो रुपये खर्चून कोलकत्याच्या बाजारपेठी भोवती भला मोठा खंदक खणायला घेतला, आजही त्याचा बराचसा भाग शिल्लक आहे त्याला - "Maratha Ditch" म्हणूनच ओळखतात.
रायगड सारखा बेलाग बुलंद दुर्ग राजधानी म्हणून निवडला तरी रायगडचे दुर्गमत्व जसे स्वत:च्या स्थानात व बांधणीत आहे तसेच त्याचे दुर्गमत्व त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या गिरीशिखरांवरती अवलंबून आहे. रायगडच्या चारही बाजूंना नजर फिरवली की - महेंद्रगड, पन्हाळगड (रायगड जवळचा), माणगड, लिंगाणा, कोकणदिवा व पसरलेला सरळसोट उभा सह्याद्री अशी ती अभेद्य जागा असल्याचे लक्षात येते. अनेकदा घाटांमध्ये अनेक चौक्या असत.

गिरीदुर्ग बांधताना अनेकदा एखादि मोक्याची जागा मिळे पण गोची अशी असे की त्या महत्वाच्या जागेला तोफेच्या टप्यात ठेवू शकेल, किंवा निदान मुख्य गडाची महत्वाची रसद मधल्या मध्ये बंद पाडू शकेल अशी दुसरी जागा आसपास असे. मग नाईलाजाने तिलाही तटबंदी बांधून तिथे लहान शिबंदी ठेवावी लागे. अनेकदा मुख्य गड जिंकायचा अथवा वाचवायचा तर ती तुलनेने दुय्यम जागाच युध्दाचे केंद्र बनत असे. अश्यामुळे महाराष्ट्रात व इतर अनेक ठिकाणी गडकोटांच्या जोड्या दिसतात -> पुरंदर - वज्रगड, पन्हाळा - पावनगड, अंकाई - टंकाई, साल्हेर - सालोटा, हि प्रातिनिधिक उदाहरणे. वास्तविक नाशिककडची एक डोंगररांगच रांगच दुर्गांनी सजल्याचे कारण हेच आहे - अचल, अहिवंत, वणी, रावळा, जावळा, कण्हेरा, धोडप, कुणदेव, हदगड, चांदवड, वेताळगड वगैरे वगैरे. नावे मोजताना धाप लागेल इतके दुर्ग तिथल्या गिरी शिखरांवरती आहेत. नाशिककडून त्या भागातून येणारी - जाणारी प्रत्येक वाट किमान २ दुर्गांच्या नजरेखाली असे.

मात्र अनेकदा आधीच बांधलेल्या जागा अडचणीच्या बनत, त्या हेरुन ते गड पाडणेच शहाणपणाचे असे. महाराजांनी जसे अनेक दुर्ग बांधले तसे काही दुर्ग याच कारणाने जमिनदोस्त देखिल केले. १६४९ साली शिरवळचा कोट असाच पाडला. कारण जो कोणी शिरवळमार्गे पुढे सरके तो हमखास हा लहानसा कोट जिंकत असे व त्यात स्थान भक्कम केले की त्याचा धोका पुरंदरला होत असे. भवनगिरी पट्टण, सावशी हि अजून काही उदाहरणे, हे गड पाडण्याची आज्ञा करणारी पत्रेच उपलब्ध झाली आहेत. हे सर्व करायला अर्थात बराच खर्च येत असे, पण पुढची सुरक्षा लक्षात घेऊन तो खर्च करुन गड पाडत. दक्षिणेत देखिल महाराजांनी असेच -२/३ दुर्ग बेवसाऊ करुन पाडले. ऐन कानडि मुलखात उभारलेल्या साजरा - गोजरा जवळचा एक कोट असाच त्यांनी पाडला.

अनेकदा बेवसाऊ झालेले दुय्यम दुर्ग पुन्हा अनेक कारणांसाठी पुन्हा वसवावे लागत. १३ मे १६५९ मध्ये बांदलांना लिहिलेल्या एका पत्रात बांदलांचा देशमुख "रायाजी" वयाने लहान असल्याने मुख्य सरदार असलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांना उद्देशुन त्यांनी लिहिले आहे कि "तुमच्या रहाळात (हिरडस मावळ)  जासलोडगड (हा सध्याचा कावळ्या कि दुर्गाडि याबाबत शंका आहेत.) सध्या ओस आहे, त्याला पुन्हा भक्कम करुन त्याचे नाव "मोहनगड" ठेवा. मी इथून २५-३० असामी पाठवतो आहे त्यांना तिथे आळंदा (पहारेकर्‍यांसाठीच्या इमारती) बांधून द्या." हा गड तसा छोटासाच पण अफझखान येणार त्याच्या पार्श्वभूमीवरती महाराज हे सांगत आहेत. प्रतापगड परीसरात लढाई झाली तर जीव वाचवायला विजापूरी सेना वरंधा, चिकना वगैरे घाटांकडे सरकली तर इथून त्यांवर लक्ष ठेवता येईल हा विचार त्या मागे आहे. अफझलखानाचा वध १० नोव्हेंबर १६५९ रोजी केला महाराज हि आज्ञा मे मध्ये देत आहेत हे लक्षात घ्या.


शत्रुची प्रगत शस्त्रात्रे व आजूबाजूला फायदेशीर ठरेल अशी परीस्थिती लक्षात घेऊन दुर्ग वसवावे लागतात. तोफा आल्या आणि दुर्ग बांधणीचे तंत्रच बदलले. महाराजांनी जे दुर्ग बांधले अथवा दुरुस्त करुन घेतले त्यात मोठा बदल म्हणजे गडाचा दरवाजा नेहली दोन बुरुजांच्या आड लपवला - त्यालाच गोमुखी रचना म्हणतात. अर्थात त्याने तोफेचा गोळा कधीच दरवाज्यावरती थेट बसत नसे. अनेकदा तटांची उंची मुदामहुन लहान ठेवत कारण तोफेतुन सुटलेला गोळा परस्पर तटबंदिवरुन पलीकडे निघून जात असे. काहिवेळा तटबंदि देखिल फारशी भक्कम नसे चार - सहा गोळ्यात ती ढासळेल अशी असे मात्र त्याच्या आजूबाजूचा प्रदेशच असा असे कि तोफा त्या भागात आणणे जवळपास अशक्य सोपे उदाहरण म्हणजे वाळवंटातील गडकोट .... आजूबाजूला नजर जाईल तिथवर रेतीचा समुद्र, तोफा वाळूत फसायची १००% हमी, त्यामुळे आजूबाजूचा प्रदेश अश्यांचे दुर्गमत्व आपोआप वाढवत असे.
महाराजांनी असे ३६० हुन अधिक दुर्ग राखले होते. "उद्या खासा आलमगिर दख्खनेत उतरेल, माझा येक येक कोट त्याविरुध्द येक येक वरुस लढला तरी त्याला दख्खन काबिज करावयास ३६० वरुसांचे आयुष्य लागेल!" हा दांडगा आत्मविश्वास त्या महामानवाच्या मनात होता. त्याचा इतिहासही आपल्याला माहित आहे. त्यानंतर मराठा साम्राज्य वाढले, अटक ते कटक या पट्यात क्वचितच असा गड असेल ज्यावर भगवा फडकला नसेल. अटक, पेशावर, लाहोर, मुल्तान, आग्रा, अगदि लाल किल्यावरती तब्बल १४ वर्ष भगवा फुरफुरला होता.
ज्या गडकोटांनी आपले स्वातंत्र्य मिळवून दिले, ते अबाधित राखले त्यांचे मोजकेच पैलू, व इतिहास आज आपल्याला माहित आहेत. मराठ्यांनी किमान एकदा पाय ठेवलेल्या ठिकाणी भेट देऊ असे ठरवले तरी ओरीसातील कटक पासून ते आजच्या पाकिस्तानातील अटकपावेतो जावे लागेल. या दुर्गांचा इतिहास बोलका केला पाहिजे. त्यांचे दुर्गमत्व प्रकाशात आणायला हवे. कदाचित तरच आपण इतिहासाच्या ऋणातुन अंशात्मक मुक्त होऊ शकू.
 - सौरभ वैशंपायन.

2 comments:

Suhas Diwakar Zele said...

सहीच.... दुर्ग रहस्य आणि दुर्ग जिज्ञासा यावर कितीही बोलत राहिले तरी कमीच... :)

Anonymous said...

सहीच!