Wednesday, October 24, 2012

दंतकथेची दातखिळ





सामान्य माणसासाठी तो एक दंतकथा होता. कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी अनेक वर्ष तो झगडला नव्हे जिंकला. वरुन ७ वेळा टूर दि फ्रान्ससारखी जगातली सर्वात कठीण सायकलिंगची स्पर्धा जिंकून जगात अशक्य काहीच नाही हे त्याने दाखववून दिले होते. हे सगळं अमानवी पातळीवरचं होतं. कर्करोगाने खचल्या लाखो जीवांचे तो प्रेरणास्थान होता. पण २००५ पासून त्याच्यावर जे आरोप होत होते त्याचा सोक्षमोक्ष अखेर गेल्या महिन्यात लागला. अर्थात त्याच्या चाचण्या आधीही झाल्या होत्या व गेल्या जूनमध्ये ज्या चाचण्या झाल्या त्यांच्या आधारावरती अमेरीकन डोपिंग संघटनेने लान्स आर्मस्ट्रॉंगवरती आरोप सिध्द केले व त्यामुळे आंतरराष्ट्रिय सायकलिंग संघटनेने त्याची टूर-द-फ्रान्सची सातही पदके काढून घेतली आणि त्यावर आजन्म बंदी देखिल घातली आहे.

एखादं व्यक्तीमत्व किती चढ-उतारातून जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे लान्स आर्म स्ट्रॉन्ग. ज्यांनी त्याचे "It's not about bike, It's about journey back to life"  हे पुस्तक वाचलं असेल त्यांना त्याचा पूर्वेतिहास माहित असेलच. आईचे २ डिव्होर्स, लहानपणापासूनच जन्मदात्या पित्याशी असलेले तणावपूर्ण संबध, त्याचे शाळा-कॉलेज मधले गरीबीतले दिवस, कॉलेजच्या दिवसात आयुष्यात येत जाणारी स्थिरता, पहिल्या २nd hand गाडिने लावलेली रेस, सायकलिंगमधला प्रवेश, सायकलिंगच पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निवडणे, स्थानिक, राष्ट्रिय पातळीवरच्या व नंतर आंतरराष्ट्रिय स्पर्धा जिंकणॆ हा प्रवास वाचताना आपण थक्क होतो. सायकलिंग मधल्या काही तांत्रिक बाबी देखिल त्याने त्यात मांडल्या त्यासाठी घ्यावी लागणारी शारीरिक, मानसिक व बौध्दिक तयारी किती वरच्या पातळीवरची असते त्याची चुणूक त्याने पुस्तकातून दाखवली होती. त्याआधी फक्त जो जिता वो सिकंदर मध्ये यावर थोडं बघायला मिळालं होतं. त्याचं पुस्तक हे सायकलिंगच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील खेळाडूला प्रेरणादायक होतं.

पण ते पुस्तक त्याने ज्या कारणासाठी लिहिला ते कारण म्हणजे त्याला या सगळ्या प्रवासा दरम्यान झालेला कर्करोग, व त्यातून त्याने - त्याच्या आईने - सहकार्‍यांनी - प्रेयसीने केलेला मानसिक - शारीरिक - भावनिक संघर्ष. त्याच्या आईशी असणारे त्याचे भावनिक नाते त्याने फार सुंदर शब्दबध्द केले आहे. तो संघर्ष वाचताना लान्सबद्दलचा आदर प्रत्येक पानातून वाढत जातो. लान्स कधी तुमचा आदर्श बनला हे तुम्हांला समजतही नाही. या पुस्तकानंतर त्याने अजून २ पुस्तकंही लिहिली, त्याची लोकप्रियता इतकी अफाट होती की त्यावरती आरोप झाले त्या नंतरही लोकांनी लान्सवरतीच विश्वास ठेवला. लान्सही अर्थात सांगत राहिला मी निर्दोष आहे. गेल्या महिन्यापर्यंत माझा व माझ्यासारख्या अनेकांचा ठाम विश्वास होता की लान्स अशी रडेगिरी करणार नाही, अगदी इथपर्यंतही मत होतं कि त्याच्या चाचण्यात काही वावगं निघालं तर कॅन्सरवरती उपचारासाठी जी औषधे घेतली जातात त्यातून अजाणतेपणी ते शरीरात आलं असेल, लान्स आपणहून हे करणार नाही. पण वाइट हे होतं कि लान्स आर्मस्ट्रॉंगचे पायही मातीचेच निघाले.खासकरुन जेव्हा त्याच्या सहकार्‍यांनी पुढे येऊन सांगितलं कि लान्स स्वत:हि हे करायचा व स्पर्धेत त्याच्या पुरक खेळ करता यावा म्हणून आम्हांलाहीत्यात सहभागी करुन घ्यायचा. या कामात त्याला त्याची पत्नीच मदत करत होती. हे सगळं ऐकून माझ्यासारख्या कित्येकांच्या आदर्शाला तडा गेला. लान्स इतकाच त्यांचा रागही आला - "हे सगळं आधी सांगायला काय झालं होतं? तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म??"

यश सगळ्यांनाच पचवता येतं असं नाही. फार ताकद असावी लागते त्यासाठी. एकदाका यश डोक्यात गेलं व फक्त यशाची तेव्हढी चटक लागली कि काय होतं? यश मिळवण्यासाठी माणूस कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो हे लान्सच्या उदाहरणावरुन समजतं. अर्थात लान्स हा काही जगातला पहिला खेळाडू नाहिये जो डोपिंग टेस्टमुळे सर्वस्व गमावून बसला आहे ना शेवटचा असेल. मात्र आता कुणावर आदर्शवत विश्वास टाकायचा कि नाही हे लोकांना ठरवावं लागणार आहे. इतके आरोप होत असताना लान्सने गप्प रहाणे पसंत केले. ना "विश्वामित्री पवित्रा" घेतला ना "नरो वा कुंजरो वा पवित्रा." तो फक्त गप्प होता, कदाचित त्याला कळलं होतं कि आता तेलहिं गेलय आणि तूपही. या दंतकथेची बसलेली दातखिळ बरेच काही सांगुन गेली.

 - सौरभ वैशंपायन.

Saturday, October 6, 2012

अक्लेश केशव मंजरी तिलकम् - अनुवाद

"अक्लेश केशव मंजरी तिलकम् - अष्टपदी" म्हणून जयदेव या ओरिसामधील कवीची एक काव्य रचना आहे. राधा हे काल्पनिक पात्र कृष्ण चरीत्रात आणण्याची कल्पना जयदेवांची समजली जाते. त्यांनी श्रीकृष्ण - राधेवरती गीत-गोविंद हे अध्यात्मिक आणि तरीही शृंगार रसाने परीपूर्ण असे काव्य रचले. माझ्या एका मित्राने - अंबरीश फडणवीस याने त्यातली अष्टपदी मला मराठीत पद्य अनुवाद करायला दिली. या काव्यात राधा किंवा गोपी म्हणा श्रीकृष्णा बरोबर आदल्या रात्री केलेल्या रतीक्रिडेबाबत आपल्या सखीला सांगते आहे अशी कल्पना आहे. मी अर्थात शब्दश: अनुवाद केला नाहीये, एखाद दुसरी गोष्ट जाग सोडूनही गेली आहे. शिवाय अष्टपदी मधली सातच पदे मी घेतली आहेत कारण आठव्या पदात तुका म्हणे - नामा म्हणे तसं जयदेवांनी स्वत:चेही "म्हणे" घातले आहे आणि स्वत:ला लक्ष्मीचा भक्त संबोधुन हे काव्य सगळीकडे सुख शांती पसरवो असेही म्हंटले आहे.

अनेकांच्या दृष्टिने हि कविता अब्रह्मण्यम्‌ होऊ शकते. पण ह्याचा अर्थ शृंगाराला आपली संस्कृती किती रसिकतेने घेत असे हे देखिल समजण्याचा उत्तम मार्ग आहे. श्री आदि शंकराचार्यांनी देखिल शिव-पार्वतीच्या प्रणयलीलांचे वर्णन केले आहे. पार्वती - लक्ष्मी यांचे तर केसापासून ते नखापर्यंत "आपादमस्तक" म्हणतात तसे अत्यंत शृंगार पूर्ण वर्णन श्लोकांत केल्याचे आपल्याला दिसते, पण त्यात कुठलीही वासना नसून केवळ स्तुती आहे. ह्या गोष्टि लक्षात घेतल्या तर मग खजुराहोतील कामुक शिल्पेही सुजाणपणे व रसिकतेने बघता येतील आणि इतिहासाचार्य राजवाड्यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचतानाही बिचकायला होणार नाही. कवीश्रेष्ठ कालिदासाने मेघदूतात तर ठिकठीकाणी अशी चुरचुरीत किंवा चटका लावणारी विरहाची किनार असलेल्या शृंगाराची पेरणी केली आहे.

भारतीय अध्यात्माला व्यक्त व्हायला कुठेही बंधने नाहियेत मग तो जयदेव - आदी शंकराचार्यांनी मांडलेला शृंगार असेल किंवा भर ’रणांगणात’ सांगितलेली गीता असेल.

तर इतकि प्रस्तावना अशा करीता कि मी कुठल्या पार्श्वभूमीवरती हि कविता करतो आहे हे तुम्हांला समजायला हवं. तरीही हे कुणाला अश्लिलतेने भरलेले वाटल्यास एकच सांगणे - मुळ काव्यासमोर माझा पद्यानुवाद फारच "पांचट" आहे.
=========================




शांत सभोवती रात्र सजणी, दूर सजले एकाकी उपवन,
अंधाराची लेवून कांती, हसतो कामूक श्यामल मोहन,
लपाछुपीचा खेळ चालला, चंचल त्या प्रणयाच्या रात्री,
मिठीत अचानक खेचून घेता, अनाम वादळ उठले गात्री ॥१॥

कामातुर स्पर्षाने त्याच्या, रोम-रोम उठले होऊन पुलकित,
कुरवाळित सांगे नकोस लाजू, नकोस होऊ उगा भयचकित,
प्रणयी गुंजरव करु लागले, मिठीस त्याच्या  घेई लपेटून,
मृदु शब्दांनी तया सुखविता, वस्त्र कटीचे गेले निसटून ॥२॥


अन्निजवले मजला त्याने, मऊ तृणांच्या शय्येवरती,
उरोज उन्नत तये चुंबिले, विसावला क्षण त्यांच्यावरती,
निरवसनी देहावर अवघ्या, सख्याचे प्रणयी हात फिरती,
उचलुन अधोमुख सल्लज चेहरा, करी दंतक्षत अधरावरती ॥३॥

प्रणयक्रिडेने म्लान होऊनी, मिटे पापणी होऊन हर्षित,
चिंब जाहले शरीर स्वेदे, तनु दोघांची होई कंपित,
मदन शरांनी दोघे जखमी, मिलन सुखाची झाली घाई,
देह बिलगता नसे विलगता, निशा धुंद मग सरकत जाई ॥४॥

सित्कारातुन प्रणय वेदना, केली जाहीर, जणू कपोत घुमतो,
प्रणयचतुर प्रियकर माझा, मला रिझविण्या अश्रांत श्रमतो,
केसांमधली कुसुमे चुरली, बटा पसरल्या धरणीवरती,
प्रणयाराधनेत येई आर्तता, नखे उमटली वक्षांवरती ॥५॥

रुणझुणणारे चुकार पैंजण, नाद तयांचा वाढत गेला,
मीलनसुखासी सेवित असता, कटिवरली तुटे मेखला,
अंबाड्यासी देता हिसका, मुक्त जाहले केस बांधले,
जवळ घेऊनी दिली घेतली न आठवी कितीक चुंबने ॥६॥

मृदु शय्येवर निवांत निजले, ओठ बिचारे होत कुसुंबी,
संभोगाचा शीण हराया, शरीर पहुडले पृथुल नितंबी,
अर्धे मिटले नयन तयाचे, नील कमलदल जणू उमलले,
नवी चेतना फुलली तेव्हा, मदनमोहना पुनश्च भुलले. ॥७॥

 - सौरभ वैशंपायन.