Friday, July 30, 2010

म्हणूनच एकदा .....

नाही आवडत मला .....
मी तुझ्या समोर असताना, तू त्याची वाट पहाणं,
त्याच्या येण्याकडे तुझे डोळे लागले असतात,
सगळं लक्ष खिडकितुन बाहेर.... त्याच्याकडे,
तो ही आधी मग तुला बराच झुलवतो,
आणि एका क्षणी अचानक येऊन उभा ठाकतो,

नाही आवडत मला .....
तो आलेला पाहिला कि तुझं धावत बाहेर जाणं,
मग तो सुध्दा तुला फार आवेगानी मिठीत घेतो,
नाही आवडत मला चारचौघात तुझ्या शरीराशी त्यानं असं झोंबलेलं,
तुला मात्र कसलीच तमा नसते,
त्याला पाहीलस कि तुला तुझं भानच रहात नाहि.

मग तु मनमोकळं हसायला सुरवात करतेस.
अश्यावेळि मला त्याचा राग येतो हे त्याला माहीती आहे,
त्याने त्याला अजुनच चेव येतो,
मला वाकुल्या दाखवत तो तुला अलगद कवेत घेतो.

म्हणूनच.... म्हणूनच एकदा,
त्याच्याच समोर तु मला किती आवडतेस हे सांगायचय एकदा,
म्हणूनच तू सोबत असताना "त्याच्या" येण्याची वाट मी बघिन,
म्हणूनच तू सोबत असताना "पाऊस" येण्याची वाट मी बघिन !!!

- सौरभ वैशंपायन.

Friday, July 9, 2010

पावसाळा

ऋतु पावसाळा, अशी सांजवेळ,
वीजांचा-सरींचा हा चालेल खेळ,
तुला आठवुनि अशी चिंब ओली,
बरसल्या सरींची कशी ओळ झाली.