Saturday, August 22, 2009

दधिची


पुराणात दधिची ऋषींची गोष्ट आहे. शेकडो वर्षे तप केल्याने अभेद्य झालेल्या आपल्या अस्थी त्यांनी इंद्राला अर्पण केल्या. त्या अस्थिपंजरातुनच देवांच्या राजाने आपले वज्र बनवले, व असुरांवर जय मिळवला. कालचक्र अविरत फिरत असते. आधी घडलेल्या घटना नवे संदर्भ घेऊन पुन्हा घडतात. "भारतरत्न डॉ. अवुल पकिर जैनुलबद्दिन अब्दुल कलाम" यांच्या रुपाने दधिची पुन: अवतरले. आपल्या प्रखर बुध्दिला पणाला लावुन या आधुनिक ऋषीने "अग्नि" नामक एक अमोघ अस्त्र भारताच्या चरणी अर्पण केले.

जो स्वप्नेच बघु शकत नाहि त्याला ती पूर्ण करण्याचा ध्यास तरी कसा असेल? मात्र प्रक्षेपक(अंतराळ) व क्षेपणास्त्र(संरक्षण) या दोन्हि बाबतीत भारताला स्वयंपूर्ण करायचे स्वप्न डॉ. विक्रम साराभाईंनी बघितले होते, कलामांनी त्या स्वप्नात स्वत:ला गुंतवुन घेतले. मुळात त्यांना पायलट व्हायचे होते पण एका क्रमांकाने त्यांचे स्वप्न मोडले......कदाचित नशिबाने त्यांच्या आयुष्यात वेगळेच लिहुन ठेवले होते. प्रथम DRDO व नंतर ISRO मध्ये त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. भारताचा पहिला indigenous Satellite Launch Vehicle (SLV-III) उपग्रह कलामांच्याच नेतृत्वाखाली सिध्द झाला, Integrated Guided Missile Development Programme (IGMDP) चे प्रमुख तेच पृथ्वी - अग्नि अशी क्षेपणास्त्रे हि कलामांच्या कष्टाची फळे आहेत. अर्थात यात आपल्या सहकार्‍यांचा वाटा अहे हे कलाम अतिशय नम्रपणे सांगतात. प्रत्येक गोष्टित ते "आम्हि" केले असे शब्द वापरतात. उगीच त्यांचे सहकारी त्यांना ऋषी संबोधत नाहित.

११ मे व १३ मे १९९८ रोजी पोखरणमधील वाळु २४ वर्षांनी पुन्हा उधळली गेली, त्या अणूस्फोटांमागचे कष्ट श्री चिदंबरम आणि कलामांचेच तर होते. अर्थात कलामांसारख्या द्रष्ट्याला शांतता अभिप्रेत आहे पण शांतता सबलांची असावी हि इच्छा. महासत्तांनी देखिल भारता विरुध्द हालचाल करताना दहावेळा विचार केला पाहिजे अशी ताकद ते राष्ट्राला देऊ इच्छितात. चीन कडे intermediate-range ballistic missile (IRBM) क्षेपणास्त्रे असताना भारताने गप्प रहाणे केवळ मुर्खपणाचे ठरेल. पाकसाठी "पृथ्वी" पुरेसे आहे पण चीन कडुन मदत घेऊन पाकने पृथ्वीला उत्तर म्हणून "घोरी" व "हफ्त" हि क्षेपणास्त्रे बनवली शिवाय चीनने त्यांना M-11 हि ३०० किमी मारा करणारी क्षेपणास्त्रे पुरवली आहेत.याला पुरुन उरायचे असेल तर अग्नि हेच चोख उत्तर आहे. म्हणुनच या सगळ्याच्या विचार करता भारताचा "अग्नि - १" ते "अग्नि - ४" म्हणजे Short Range Ballistic Missile ते Intercontinental Ballistic Missile इथपर्यंतचा प्रवास कसा झाला हे जेव्हा इतिहास नमुद करेल तेव्हा त्यात अब्दुल कलामांचे नाव या चारहि रेंजच्या अग्नि समोर असेल.

विचाराने इतके आक्रामक असलेले कलाम मनाने मात्र तितकेच हळवे आहेत. म्हणुनच चेन्नई मधील एका इस्पितळातील अपंग मुलांना पाहुन त्यांना वाईट वाटले ती लहान मुले जड कुबड्यांचा संसार ओढताना बघुन त्यांच्या पोटात गलबलले. म्हणुनच कुबड्यांसाठी मजबुत पण अतिशय हलक्या धातुंचा वापर करावा असा विचार त्यांनी केला व या भेटिने मुले "खेळु" लागली. याखेरीज बायपास चा प्रश्न खुप खर्चिक होता. परदेशी स्टेन्स खुप महाग असल्याने गरीब-गरजु लोकांना हि शस्त्रक्रिया करुन घेणेआर्थिक दृष्ट्या कठिण होते मात्र डॉ. कलाम व डॉ. सोम राजु या दोघांनी नवा आणि स्वस्त इतकेच नव्हे तर परदेशी स्टेन्स पेक्षा प्रगत असा देशी स्टेन्स बनवुन हृदयरोग्यांना दिलासा दिला.

काळाने डॉ. कलामांच्या पदरात त्यांच्या योगतेचे माप पूरेपुर ओतले. सर्व भारतीयांच्या सुदैवाने ते राष्ट्रपती बनले. त्यांनी तरुण रक्ताला २०२० चे स्वप्न दाखवले. आज आम्हि तरुण मुले ते स्वप्न घेऊन जगतोय. तामिळनाडुच्या किनार्‍यावरील एका बोटकामगाराचा मुलगा ते राष्ट्रपतीपद हा प्रवास सोपा खचित नव्हता. अनंत ध्येयासक्ती असलेली माणसे काय करु शकतात याचे चालते बोलते उदाहरणच आंम्हाला २०२० चे स्वप्न देत आहे यापेक्षा भाग्याची गोष्ट ती काय?

इतके मान - सन्मान मिळुन त्यांचे पाय कधी जमिनीवरुन सुटले नाहित. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनांनंतर इतका दूरचा विचार करणारा राष्ट्रपती भारताला मिळाला. कलाम पूर्णत: शाकाहारी आहेत. पुस्तकं, वीणा, शास्त्रीय संगीताच्या कॅसेट व विज्ञान इतकिच माझी मालमत्ता आहे असे ते गंमतीने म्हणतात. पण त्यात अतिशयोक्ती नाहि. ३४४ खोल्यांच्या राष्ट्रपती भवनात हा माणूस २ सुटकेस भरुन गेला व परत येताना २ सुटकेस घेऊन बाहेर आला. आपले नातेवाईक चार दिवस राष्ट्रपती भवनात आले तेव्हा त्यांचा खर्च हा स्वत:ला मिळाणार्‍या पगारातुन केला सरकारी खात्यात नव्हे. ब्रह्मचारी असल्याने कुठलेहि सांसारीक मोह नाहि त्यामुळे खरोखरच ते ऋषी आहेत!


- सौरभ वैशंपायन.

Wednesday, August 19, 2009

दुरुन डोंगर साजरे!!

दुर डोंगरावर ढगांचे थवे उतरताना पाहण्यासारखा सुंदर अनुभव दुसरा क्वचितच असेल. पावसाने हिरवे झालेले डोंगर आणि अंधारुन आल्याने गडद निळसर दिसणारे त्यांचे कडे, मग त्यांच्या डोक्यावरुन अलगद सरकणारे आत्म्यांसारखे गुढ - संथ धुके, गंभीर, निशब्द, गार, हुरहुर लावणारे आणि किंचित दडपण आणणारे. त्या मागोमाग ढगांचे थवे. थकल्यावर आपल्याला मोकळ्या, अंग पसरता येण्याजोग्या जागेची जशी स्वाभाविक ओढ लागते तशीच या ढगांना डोंगरमाथ्यांची लागत असावी. मात्र या ढगांच्या ताफ्यात काळे ढग मात्र तीन किंवा चार. बाकि सगळे करड्या रंगाचे. आपण जिथे उभं असतो तिथुन थेट डोंगराचा पायथा दिसत असतो, डाव्या-उजव्या बाजुला एखादि बुटकि टेकडि बाकि डोंगराच्या माथ्यापर्यंत मोकळे मैदान, हिरवी शेते, झाडांच्या गच्च रांगा. मधुनच एखाद्या एकांड्या शिलेदारा सारखा सगळ्या चित्राहुन वेगळा पण चित्र खुलवायला सरसरत आकाशाकडे वाढलेला उंऽऽच माड. माडाच्या झाडाला दुसर्‍या झाडाला स्पर्ष आवडत नाही म्हणे.... म्हणूनच असा एकांडा!!

आणि त्या बुटक्या टेकडिवर एक छानसे पांढरट मंदिर, त्याच्या कळसाच्या माथ्यावर पावसाळी हवा खात अव्याहत फुरफुरणारा भगवा झेंडा. आणि अश्याच एखाद्या क्षणी डोक्यावरचा ढग विरळ होत जातो, अचानक त्या माडाच्या झावळ्यांना, शेतातील पोपटि गवताला तजेला आल्यागत वाटु लागते. त्या विरल्या ढगातुन सुर्याची किरणे त्या टेकडिवर उतरतात....फक्त टेकडिवरच, बाकि ठिकाणी सावलीच. मग प्रकाशाचे फराटे उठतात आणि मिनिटभरासाठी सुर्यनारायण दर्शन देतात. परत मागचे ढग तरंगत पुढे सरसावतात. विरलेले ठिगळ पुन्हा जोडतात. आता टेकडिवर सुध्दा सावली येते पण त्या ढगांची वरची किनार मात्र चांदि लावल्यागत चंदेरी होते. त्या काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर उडणारे ४-६ बगळे उगीच सुंदर भासतात.

मग सगळं उत्कट उत्कट होत जातं आणि परत एखादि पावसाची सर येते, डोंगरावर नवे अंकुर उगवतात.... डोंगराला अजुन हिरवेगार करण्यासाठी.

- सौरभ वैशंपायन.

Tuesday, August 18, 2009

दिसलीस तू फुलले ऋतु

दिसलीस तू फुलले ऋतु, बाबुजींनी अजरामर केलेले अप्रतिम गाणे!


----------------------------------------------

Get this widget | Track details | eSnips Social DNA

बडि नाजुक है ये मंझिल...

जॉगर्स पार्क मधील सुंदर गीत!

......................


Get this widget | Track details | eSnips Social DNA

Wednesday, August 5, 2009

अश्वत्थ!




एखाद्या अंधार्‍या खोलीत एका कोनड्यात कुणीतरी समईची मंद वात लावावी आणि तिच्या शांत तेवण्याने अवघी खोली तीच्या सोनप्रकाशाने भरुन जावी असेच काहीसे सातशे वर्षांपूर्वी झाले. आक्रमकांच्या वरवंट्याखाली अवघा समाज भरडुन निघत असताना चार भावंडांनी ब्रह्मविद्येचा सुकाळु करावा ….... अगदी ठरल्यासारखा, हे एखाद्या आश्चर्यापेक्षा काही वेगळे नव्हते. बरं स्वत: चारही भावंडे त्याच समाजाच्या निरर्थक हेटाळणीस पात्र ठरलेली असताना त्याच बोचकारणार्‍या समाजाला “जो जे वांछिल तो ते लाहो।“ म्हणण्याचा समजुतदारपणा तरी कुठुन यावा? निवृत्तीनाथ स्वत: नाथपंथीय, ज्ञानेश्वरांनी त्यांच्याकडुन तीच दिक्षा घेतली. मात्र नीट बघितल्यास लक्षात येते कि नाथपंथीय असुन त्यांनी वैदिकांच्या परंपरेत प्रवेश केला व त्याच चौकटित राहून कर्मकांडांत अडकलेल्या वैदिकांचा पराभव केला. मात्र अखेर भागवत धर्माची पताका वैदिकाच्याच पायावर उभी केली. कर्मकांडाच्या पलिकडे जाऊ त्यांनी सर्वांना अध्यात्माची दारे मोकळी करुन दिली. स्वत: नाथपंथीय म्हणाजे शैव असुन भक्ती विठ्ठलाची म्हणजे विष्णुची केली. अवघा हरी-हराचा भेद कृतीतुन मिटवुन टाकला. श्रुतीस्मृतीपुराणोक्त वागणार्‍या समाजात वर्णभेद, जातिभेद, रोटि-बेटि बंदी अनेकविध दैवतांच्या उपासना अघोरी तंत्रोपासना यांमुळे विस्कळितपणा आला होता. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांचा उदय हा महत्वाचा ठरतो. तत्कालिन ग्रंथसंपदा ही संस्कृत भाषेत होती. सामान्यजन त्यापासुन कोसो दूर होते. त्याच ज्ञानाला ज्ञानेश्वरांनी प्राकृतात आणले. बरं इतके ज्ञान आत्मसात केले व नि:स्पृहपणे ते वाटले, तिथे गर्वाचा लवलेशही कधी दिसला नाही.

भग्वतगीतेसारख्या खुद्द भगवंतांच्या मुखातुन निघालेल्या स्वयंभू वाक-प्रवाहात आकंठ डुंबुनहि ज्ञानेश्वरांची तहान भागत नाहीच वरुन त्यात आकंठ बुडुन मला अजुन काहीच समजले नाहिये हा भाव सदैव कृतीत व उक्तीत दिसतो, किती हा नम्रपणा?? मी जी भावार्थदिपिका सांगत आहे ती केवळ अजाण बालकाची बडबड आहे, तरी सगळ्या श्रोत्यांनी मज अज्ञ बालकाचे वेडोकोडे बोबडे बोल गोड मानुन घ्यावेत हे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात –

नातरी बालक बोबडां बोली । कां वाकुडां विचुकां पाऊलीं । तें चोज करुनि माऊली । रिझे जेवी ।।
बाळक बापाचिये ताटीं रीगे । रिगौनि बापातेंच जेवऊं लागे । की तो संतोषलेनि वेगे । मुखचि वोडवी ।।


ज्याप्रमाणे एखादी आई आपले लेकरु वेडेवाकडे चालते, बोबडे बोलते तरी त्याचे कौतुक करते किंवा बाप जेवत असताना बालक रांगत जाऊन त्याच्याच ताटात हात घालुन बापालांच घास भरवायला लागते व बाप ते पाहुन आनंदाने तोंड पुढे करतो तसे तुम्ही येथे जमलेले सर्व संत - सज्जन मला समजुन घ्या. पुढे गीतेवर टिका लिहिणे किती कठीण आहे हे सांगताना माऊली म्हणतात -

ऐसे जें अगाध। जेथ वेडावती वेद। तेथ अल्प मी मतिमंद। काय होय।।
व्यासादीकांचे उन्मेष, रहाटती जेथ साशंक। तेथे मी एक रंक, वाचा लै करी।।


ज्या ज्ञानाची उकल करताना व्यासांसारखे ज्ञानभानू सुध्दा चाचपडतात, जेथे वेद नेती नेती म्हणतात तिथे मी फार वाचाळ असल्यागत बडबड करत सुटलो आहे.

पुढे तेच ज्ञानदेव अर्जुनाची जागा घेऊन भगवंतांना विनवणी करताना दिसतात की बा भगवंता आत्मा, पुनर्जन्म, अनादि-अनंत असलेल्या संदिग्ध गोष्टी सांगुन मला गोंधळात टाकु नकोस, किंवा सांगायच्या असतील तर मला समजतील अश्या भाषेत सांग अशी विनवणी ते करतात व ती विनवणी एकट्याची नसुन अवघ्या मराठी जनांची आहे याचे भान देखिल त्यांना आहे ते म्हणतात –

म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थ आतां न बोलावा ।। मज विवेकु सांगावा। मर्‍हाठा जी।।

हळुच आपल्या विनवणीत ते सहज मर्‍हाठा जीं ना त्यात सामावुन घेतात. मराठी भाषेबद्दल आपल्या माणसांबद्दल ज्ञानेश्वरांना किती आत्मियता होती हे यातुन दिसुन येते. आपण जे शाश्वत - शुध्द ज्ञान सांगत आहोत ते सर्वसमावेशक असले पाहीजे, ते सहज – स्वाभाविक असले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष आहे. ज्यांना प्रपंच देखिल धड चालवता येत नाहि अश्यांना परलोकाच्या गोष्टि सांगुन काय उपयोग? या वास्तवाची जाणीव त्यांना आहे. या खेरीज आपल्या समोर संत-सज्जनां खेरीज आपला सद्गुरु बसला आहे तो आता केवळ आपला थोरला बंधु नसुन मार्गदर्शक आहे याचेही योग्य भान त्यांना आहे. त्याने दिलेले ज्ञान आपण आत्मसात केले आहे याची खात्री सुध्दा आपल्या गुरुला झाली पाहिजे व अगदि सामान्य माणसालाही गीतेचे मर्म समजले पाहिजे अश्या भाषेत ते सांगण्याचे प्रचंड अवघड काम ज्ञानेश्वर सहज करत आहेत.

सगळी ज्ञानेश्वरी त्यांनी अतिशय रसाळ, मधाळ व लयबध्द लिहिली आहे. गीतेतले मोठे मोठे दृष्टांत सुध्दा त्यांनी सोप्पे करुन सांगितले आहेत. इतकेच कशाला? ज्या करीता योगीजन आपले आयुष्य खर्ची घालतात त्या कुंडलिनीवर टिका लिहिताना ज्ञानेश्वर सहाव्या अध्यायात भगवंताचे बोल सहज लिहुन जातात –

“ गुद मेंढ्राआंतौति । चारी अंगुळें निगुतीं । तेथ सार्ध सार्ध प्रांती । सांडुनियां ॥
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनीते ॥
नागाचे पिलें। कुंकुमें नाहलें। वळणी घेऊनि आलें। सेजे जैसें॥
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥ “


हे पार्था, गुदद्वाराच्यावर चार अंगुळे, कुंडलिनी खाली तोंड करुन साडेतीन वेटोळे घालुन निद्रिस्त असते. तिला जागृत करण्यासाठी काय करावे ते सांगताना भगवंत म्हणतात -

“ उचलिले कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥
अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ॥ “


प्रथम वज्रासन घालुन गुदद्वार आत ओढुन घ्यावे, इथे मुलबंध लागतो. अपान वायु आत कोंडला जातो. मग पुढे पुढे ते काय होते ते सांगत जातात, आधी बुबुळे टाळुच्या मध्यभागी असलेल्या सहस्त्रदलांच्याकमळाकडे लागतात व मग बुबुळे भ्रुमध्यावर स्थिरावतात. नंतर हळुहळु ती नासिकाग्रावर स्थिरावतात, नजर अर्धोन्मिलीत होते. हनुवटी खाली जाऊन कंठकुपीवर दाबली जाते. नाभी व पोट आत खेचले जाते व हृदय प्रकाशाने भरते. असे स्वाधिष्ठानचक्र जागृत झाल्यावर क्षुधा व निद्रा यांची जाणिव राहत नाही.

“ जो मुळबंधे कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ॥
क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायी गाजे । मणिपुरेंसी झुंजे । राहोनियां ॥
भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे । कफपित्ताचे थारे । उरों नेदी॥
धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥
नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकांते भेडसावी । परि बिहावें ना ॥
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनीते ॥
नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥
विद्युलतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥ “


मुलबंधात कोंडलेला अपानवायु उर्ध्व दिशेस जायला सुरुवात करतो. तो मणिपुरचक्रांत क्षोभ(हालचाल) निर्माण करतो. आणि कुंडलीने जागृत व्हायला सुरुवात होते. कुंडलिनी तिचे वेटोळे सोडुन वर सरकु लागते ती एखाद्या कडाडणार्‍या वीजेसारखी असते. मग शरीरातले धातुंचे समुद्र तो अपान ओलांडायला सुरुवात करतो, मेदाचे पर्वत फोडुन चुर करतो.

“ सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविलीं तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥
तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥
मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी ।आरोगुं लागे ॥
जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥
आधार तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेशीं ॥
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव बाहेरी विरुढी करपे । रोमबीजांची ॥
मग सप्तधांतूच्या सागरीं । ताहानेली घोंट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥
नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळे बारा । तो गचिये धरुनि माघारा । आंतु घाली ॥ “


तिची बहुत दिवसांची भुक भागवायला ती हृदयाखाली असलेला वारा पिऊन टाकते, तिच्या ज्वाळा मांस जणु जाळत जातात.तळहातांत भिनुन ती नखांचे सत्व शोषते. अस्थि व हाडांच्या नळ्या तो अपान निरपुन घेतो. सगळ्या रोमांतुन ती उर्जा भिनते. सगळे सांधे झडत आहेत कि काय असे वाटते. शरीरातील सप्त धातुंचे समुद्रच ती कुंडलिनी पिऊन टाकते. शरीरातील वायु नाकांतुन आत येतो व गुदद्वारांतुन सुटत जाणारा अपान माघारी फिरतो. अखेर ती शरीरातील सगळा ओलावा चाटुन घेते.

“ ऐसी दोनी भुतें खाये । ते वेळी संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥
तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूषे । प्राणु जिये ॥
तो अग्नि आंतूनि निघे । परि सबाह्य निववूंचि लागे । ते वेळी कसु बांधिती आंगे । सांडिला पुढती ॥
इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥ “


व अखेर संपुर्ण जागृत झालेली कुंडलिनी गरळ ओकते. त्यातुनच अखेर शरीराला पुन: प्राणवायु मिळतो. शरीराला नविन संजीवनी मिळते. इडा-पिंगला एकत्र वाहु लागतांत. पुढे संपूर्ण क्रियेचे वर्णन करताना कि इडा व पिंगला या चंद्र व सुर्याच्या प्रतिनीधी आहेत अशी कल्पना करुन ज्ञानेश्वर म्हणतात कि इडा पिंगलां व मेरुदंडातुन मस्तकाच्या मध्यभागापर्यंत जाणारी मध्यमा यांच्यात अक्षय उर्जेचा अविरत संचार सुरु होतो. मस्तकातुन चंद्राच्या चांदण्यासारखा शीतल प्रवाह खाली झीरपु लागतो.

अखेर कुंडलीनी जागृत झालेला देह कसा दिसतो याचे वर्णन ते पुढिल प्रमाणे करतात –

“ तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा ॥
हो कां जे शारदियेचे वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥
तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये । मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥
कनकद्रुमाचां पालवीं । रत्नकळिका नित्य नवी । नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥
दांतही आन होती । परि अपाडें सानेजती । जैसी दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥
माणिकुलियांचिया कणिया । सावियाची अणुमानिया । तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचियां ॥
करचरणतळें । जैसीं कां रातोत्पळें । पाखाळीं होती डोळे । काय सांगो ॥
आइके देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें । जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥ “


तो देह जणु सोनचाफ्याच्या ताज्या टवटवीत कळी सारखा दिसतो. शरदाच्या चांदण्यातील चंद्रबिंबाने न्हाऊ घातलेल्या मुर्तीप्रमाणे भासतो. सर्व देहांतुन चंद्रबिंबाचीच प्रभा ओसांडु लागते. त्या योग्याची नखे सुध्दा रत्नांसारखी नवेली दिसतात. व दात हिर्‍यासारखे भासमान होतात. अंगावरील रोमांच माणिकांसारखे प्रतित होतात. देह सोन्याचाच भासतो. मात्र त्यात जडपणाचा अंशही नसतो. अवघा देह वायुसारखा हलका होऊन जातो.


“ मग समुद्रपैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके । मनोगत ओळखे । मुंगियेचे ।।
पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे । येणें येणें प्रसंगे । येती बहुता सिध्दी ॥
हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी । ते फेडुनियां वेगळी । ठेवली तिया ॥
नातरी वारयाचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निमटली । कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥ “


एकदाका कुंडलिनी जागृत झाली की त्या योग्याला समुद्रापलीकडचे दिसते. मुंगीच्या मनातील गुपित सुध्दा समजते. ती कुंडलीनी सोनसळी वस्त्र ल्यायल्यागत असते, व वार्‍याची पुतळी असल्यागत तिचा संचार असतो. दिठी म्हणजे दृष्टीला जशी गगनातली क्षणभर लखलखणारी वीज भासावी तशीच ही अक्षय उर्जा होय. मात्र हे इतके सहज साध्य नाही, हे सांगताना ते मधल्या एका ओवीत म्हणतात की गृहस्थाश्रमाचे ओझे जड होते म्हणुन संन्यास घेतात मात्र संन्यासकर्माचे ओझे हे त्याहुन कठीण आहे. बाराव्या अध्यायात तर ते योग्यांच्या मार्गाला किती संकटे असतात तेहि सांगतात. -


“ कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग । आणि शून्येंसीं आंग । झुंजवावें कीं ॥
ताहानें ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी । अहोरात्र वावीं । मवावा वारा ॥
शीत वेढावें । उष्ण पांघुरावें । वृष्टीचिया असावें । घरांआंतु ॥
किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा । भातारेंवीण करावा । तो हा योगु ॥
ऐसें मृत्यूहूनि तीख । कां घोंटे कढत विख । डोंगर गिळितां मुख । न फाटे काई ? ॥
म्हणौनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ “


कामक्रोधांची वादळे येतात, तहान लागली की तहान पिऊनच रहावे लागते, भुक लागली की ती भुकच खाऊन पोट भरावे लागते, थंडीत वाराच पांघरावा लागतो तर उन्हाळ्यात उन सहन करावे लागते. किंबहुना पती नसताना सती जाण्यासारखा हा प्रकार आहे. जळजळीत विष प्यावे किंवा डोंगर खाताना तोंड फाटावे असे क्लेष वाटेला येतात. थोडक्यात सामान्यांनी निष्कारण व्यवस्थित चाललेला संसार सोडुन मुक्तीच्या मागे पळु नये असेच त्यांना वाटते आहे. कदाचित आपल्या आई वडिलांच्या व तदनंतर या चार भावंडाच्या वाटेला आलेल्या क्लेषाचा हा परीणाम असेल किंवा गीतेत सांगितलेली योग्याची लक्षणे अनुभवल्यानंतर आलेला हा शहाणपणा असेल पण देव मिळवायला कार्य विन्मुख होऊ नये असेच ज्ञानदेव सांगताना दिसतात.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडें सारख्या दिग्गजांनी रामदास स्वामी वगळता बाकी सगळ्या संतांना टाळकुटे व परकिय आक्रमण आले असतां देव-देव करायला लावल्याचे आरोप ठेवले आहेत. इतिहासाचार्यांच्या नखाचीही सर मला नसताना त्यांचे हे मत तितकेसे बरोबर नव्हते हे नम्रपणे नमुद करावेसे वाटते. तसे असते तर तत्कालिन भारताची अवस्था बुध्द धम्माच्या उदयानंतर पाचशे वर्षांनी जशी युध्दविन्मुख होत गेली भारताच्या पौरुषाचे जे नुकसान झाले तशीच झाली असती. पण तसे झाले नाही आक्रमणे भरपुर झाली मात्र याच संतांमुळे लोकांत आशा जिवंत राहिली हेच खरे.

ज्ञानेश्वरांबाबत कितीही लिहिले तरी कमीच आहे. ते सद्गुरु आहेत, ती माऊली आहे. असामान्य बुध्दिमत्ता व आत्मज्ञानाची जाणीव झालेली एक लोकोत्तर अद्भुत व्यक्ती असेच ज्ञानदेवांचे सरळ सोपे वर्णन करता येईल. नियतीने दिलेले कार्य पुर्ण केल्यावर कसलाही मोह न धरता ते शांतपणे समाधीरुप झाले. “तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर। असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ “ हे गीतेतलेच वचन ते जगले असेच म्हणावे लागेल. आज सातशे वर्षांनी देखिल ज्ञानदेव एखाद्या पुराणकालिन अश्वत्थ वृक्षाप्रमाणे अखंड शीलत सावली देत उभेच आहेत. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात क्षणभर त्याच अश्वत्थाच्या सावलीत विसावा घेऊन, त्यांची एकतरी ओवी अनुभवण्याचा हा तोकडा प्रयत्न.


- सौरभ वैशंपायन