Saturday, April 11, 2009

वदले छत्रपती...

शिवछत्रपतींसारखा द्रष्टा राजा हजार वर्षांतुन एकदा होतो. शिवछत्रपतींना आपण एक कुशल योध्दा व अतिकुशल राजकारणी म्हणुन ओळखतो पण त्याच बरोबर छत्रपती शिवराय हे कुशल संघटक व जनतेची पोटच्या पोरा प्रमाणे काळजी घेणारे त्यांचा प्रतिपाल करणारे जाणते राजे होते. इतिहासार्य वि. का राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अतिशय बारीक अभ्यास केला आहे. त्यांनी "मराठ्यांच्या इतिहासाची साधने" हा अनेक खंडांचा ग्रंथच लिहुन काढला आहे. त्यातील एक पत्र इथे देतो आहे. यात महाराजांनी आपल्या अधिकार्‍यांना व सैनिकांना जनतेला त्रास होणार नाहि यासाठी कसे वागावे व घोडे - सैनिक यांची काळजी कशी घ्यावी हे अतिशय स्पष्टपणे लिहिले आहे. महाराज किती दुरवरचा विचार करत हे या आज्ञापत्रावरुन दिसुन येते.

-----------------------------------------------------

मशरुल अनाम राजश्री जुमलेदारानी व हवालदारानीं व कारकुनानी दिमत पायगो मुक्काम मौजे हलवर्ण ता। चिपळूण मामले दाभोळ प्रति राजरी शिवाजी राजे सु ॥ अर्बा. सबैन अ अलफ. कसबे चिपळुणीं साहेबीं लष्कराची विले केली आणि याउपरी घाटावरी कटक जावें ऐसा मान नाहि. म्हणून एव्हां छावणीस रवाना केलें. ऐसीयास, चिपळुणी कटाकाचा मुक्काम होता ताकरींता दाभोळाच्या सुबेयांत पावसाकाळ्याकारणें पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होऊन गेला. व चिपळुणा आसपास विलातीत लष्कराची तसवीस व गवताची व वरकड हरएक बाब लागली. त्याकरीतां हाल काहि उरला नाही. ऐसे असतां वैशाखाचे वीस दिवस, उनाळा, हेही पागेस अधिक. बैठ पडली. परंतु जरुर जाले त्या करितां कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे.त्यास, तुम्हि मनास ऐसा दाणाअ, रातीब, गवत मागाल, असेंल तोवरी धुंदी करुन चाराल, नाहींसे जालें म्हणजे मग काहीं मग पडत्या पावसांत मिळाणार नाहीं, उपास पडतील, घोडी मरायास लागतील. म्हणजे घोडीं तुम्हीच मारीली ऐसें होईल व विलातीस तसवीस देऊं लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुबभ्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटें, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करूं लागलेत म्हणजे जी कुणबीं घर धरुन जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊं लागतील. कितेकौपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल कीं मोंगल मुलकांत आले त्याहूनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल तेव्हां रयतीई ब घोडियांची सारी बदनामी तुम्हांवर येईल! हे तुम्ही बरे जाणून, सिपाही हो अगर पावखलक हो, बहुत यादी धरुन वर्तणूक करणें. कोण्ही पागेस अगर मुलकांत गांवोगांव राहिले असाल त्याणीं रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाहीं. आपल्या राहिला जागाहून बाहीर पाय घालाया गरज नाहीं. साहेबीं खाजानांतून वाटणिया पदरीं घातलिया आहेती. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेंढोरें वागवीत असांल त्यांस गवत हो, अगर फाटें, बाजीपाले व वरकड विकावया येईल तें रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावें. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाहीं. व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजीनें साणा रातीब कारकून देत जातील तेणेंप्रमाणे घेत जाणें, कीं उपास न पडतां रोजबरोज खायाला सांपडे आणि होत होत घोडीं तवाना होत ऐसे करणें. नसतीच कारकुनासी धसपस कराया, अगर अमकेंच द्या तमकेंच द्या ऐसे म्हणाया, धुंदी करुन खासदारकोठींत, कोठांरात शिरुन लुटाया गरज नाही व हालीं उन्हाळ्याला आहे तैसें खलक पागेचे आहेत, खण धरुन राहिले असतील व राहतील, कोण्ही आगट्या करितील, कोणी भलतेच जागा चुल्ही, रंधनाळा करितील, कोण्ही तंबाकूला आगी घेतील, गवत पडिले आहे ऐसे मनास ना आणिता म्हणजे अविस्राच एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारे गवत व लहाळ्या आहेत तितक्या एकेएक जळों जातील. तेव्हां मह काही कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनांस ताकीस करावी तैसी केली तर्ही कांही खण कराया एक लाकुड मिळणार नाहीं, एक खण होणार नाहीं. हे तो अवघियाला कळतें. या कारणें, बरी ताकीद करुन, खासेखासे असाल ते हमेषा फिरत जाऊन, रंधनें करिता, आगाट्या जाळिता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वांचेल ते करणें. म्हणजे पावसाळा घोडीं वाचली. नाही तर मग, घोडीं बांधावी न लगेत, खायास घालावे नलगे, पागाच बुडाली!!! तुम्ही निसु=ऊर जालेत!!! ऐसे होईल. याकारणें तपशिलें तुम्हांस लिहिले असें. जितके खासे खासे जुमलेवार, हवालदार, कारकून आहा तितके हा रोखा तपशिलें ऐकणें, आण हुशार राहाणें वरचेवरी, रोजाचारोज, खबर घेऊन, ताकीद करून, येणेंप्रमाणें वर्तणूक करितां ज्यापासून अंतर पडेल, ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास, माराठियाची तो उज्जत वाचणार नाहीं, मग रोजगार कैसा? खळक समजों जास्ती केल्यावेगळ सोडणार नाही. हे बरे म्हणून वर्तणूक करणें. छ १२ सफर.


(मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड ८ – वि. का राजवाडे)

-----------------------------------------------------


मशरूल – लोकमान्य, अनाम – लोक, जुमलेदार – सरकारी अधिकारी, हवालदार – तालुक्याचा अधिकारी, दिमत – पदरचे, तैनात. पायगो – खाजगी उत्पन्नाचा प्रांत, मामले – परगणा, प्रदेश. अर्बा – चार, सबैन – सत्तर, अलफ – हजार, कटक – सैन्य, पागा – घोडदळ, अजार – उपद्रव, विले – व्यवस्था, सामा – साठा, रातीब – रोजची सामग्री, धुंदी - हल्ला, तसवीस – उपद्रव, पावखलक – पायदळ, यादी धरून – आठवण ठेवून, रास घ्यावे – पैसे देऊन घ्यावे, ज्याजती - जबरदस्ती, कलागती – भांडण, खलक – सैनिक, रंधनाळा – स्वयंपाकाचे मोठे चुलाणे, अविस्राच – अचानक, खण – तंबू, तजविज – तयारी. लहळे – गंजी भारे, अंतर पडेल – दुर्लक्ष केले जाईल, निसूर – निश्चिंत, छ १२ – तारीख बारा. सफर – मुस्लीम कालगणनेचा दुसरा महिना.

1 comment:

रोहन... said...

http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/03/blog-post_7413.html

see same letter image ... !