Saturday, January 12, 2008

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!




भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे.

या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे. हे चौघही उत्तर-दक्षीण-पूर्व-पश्चीम अश्या भारताच्या ४ टोकांतुन जन्मले मात्र त्यांचा प्रभाव संपूर्ण भारतभर पसरला आहे. या पैकी एकाने तर भारताच्या सीमाहि ओलांडल्या आहेत. भारताचा इतिहास या चार व्यक्तींशिवाय कदापि पूर्ण होणार नाहि इतके अलौकीक-प्रचंड आणि विस्मयकारक काम त्यांनी करुन ठेवलय.

ही चौघाच डोळ्यासमोर का आली?? तर याचं पहिलं उत्तर "माहित नाहि!" असंच आहे. मात्र विचारांती थोडस तुटक आणि अंधुक उत्तर मिळत - "हे चौघही उत्तम विध्यार्थी होते, हे चौघही उत्तम गुरु होते, हे चौघही द्रष्टे होते आणि महत्वाचं म्हणजे ह्या चौघांकडे "चारीत्र्य" होते, शुचिता होती." या चार गुणांमुळेच आपले सुस्पष्ट ध्येय आणि अढळ निष्ठा त्या चौघांकडे होती. त्यांचा जन्म ही त्या काळची गरजच होती. आणि काळाची गरज म्हणण्यापेक्षाही जणु काळाने/नियतीने यांचा जन्म होणारच अशी मांडणी केली होती. एखाद्या महानाट्यात एका पात्राने रंगमंचावर प्रवेश करावा आणि बघता बघाता त्या संपूर्ण रंगमंचाचा ताबा घेउन लोकांना स्तिमीत कराव, तसे ते चौघे आले - त्यांनी पाहिलं - त्यांनी जिंकल. विष्णुच्या अवतार संकल्पनेवर कोणाचा विश्वास बसला नाहि तरी हे चार अवतारच असावेत असे यंच्या ’इतिहासाकडे’ बघुन पटत.

वर म्हंटल्याप्रमाणे हे चौघ उत्तम विद्यर्थी होते, आणि ते ज्या गुरुकुलाचे अथवा गुरुचे शिष्य होते मुळात त्याच व्यक्ती असामान्य होत्या. आणि उलट त्या गुरुकुलाचे अथवा गुरुचे शिष्य बनण्यासाठी त्या ’शिष्यांची’ पात्रता असणं जास्त महत्वाचं होतं. या चार जणांच्या गुरुकुलाच्या अथवा गुरुच्या प्रभावाखाली-छत्राखाली कदाचित इतरही हजारो जण शिकले असतीलही, पण मग हेच चौघ का? हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. याचेच उत्तर म्हणजे सर्वोत्तम विद्यार्थी असणे हा गुण उपजतच त्यांच्यात होता. ते जे शिकले ते त्यांनी आचरणात आणलं त्याने इतरांचं भलं कसं होईल याचा विचार केला. त्यानी आपल्या गुरुंचे पांग फेडले.

पुढे ते स्वत: गुरु झाले आणि आपलं कार्य चालवणारी अनेक माणसे त्यांनी घडवली. या पैकी दोघांनी राजकारणात येणार्‍या पिढ्यांना पाठ घालुन दिले तर इतर दोघांनी समाजकारणात. आणि त्यांचा कालखंडही आलटुन पालटुन आहे. म्हणजे सर्वप्रथम राजकारण मग समाजकारण मग परत राजकारण आणि सरते शेवटी समाजकारण अशी कालानुरुप मार्गदर्शक तत्वे आणि क्रिया त्यांनी त्यांच्या क्षेत्रात घडवल्या. यापैकी पहिल्या दोघांचा कालखंड हा हजार वर्षांच्या अंतराने आलाय मग परत हजार वर्षे गेली आहेत आणि शेवतच्या दोघांत फक्त काहि शे वर्षांचे अंतर आहे. सगळं कसं अगदी ठरल्या सारखं घडत गेलय. इथे मी समाजकारण आणि धर्म हे एकमेकांत गुंतले असल्यानं संपुर्ण प्रक्रीयेलाच समाजकारण म्हंटलं आहे. त्यात "लोकांनी धारण केलेला आहे तो अथवा जो लोकांनी धारण करतो तो ’धर्म’" या व्याख्येचा वापर अपेक्षीत आहे. म्हणुन त्यातील दोघंजण हे धर्माचे पालन अथवा समाजकारणच करत होते असं म्हणता येईल. उरलेल्या दोघांनीही देव-देश-धर्म यांना दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्व दिल्याचं दिसतं.

आता "द्रष्टा" म्हणाजे काय ते या चारही जणांकडे बघुन समजतं. क्षणभंगुर सुखाच्या मागे धावणारा सामान्य माणुस हा शक्यतो मी-माझा या पलिकडे विचार करत नाहि. काळाची पाऊले त्याला ओळखता येत नाहित. उलट ती ओळखता येत नाहित म्हणुनच तो सामान्य ठरतो. मेंढरासारखे एकाच्या मागे दुसरा त्यामागे तिसरा असे करत आयुष्य घालवतो. मात्र समाजाच्या आखुन दिलेल्या चौकटितुन काहि माणसे बाहेर पडतात, त्यांना काळाची पाऊले ओळखता देखिल येतात. तशी ते आपली कृती ठरवतात ज्याने संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य उज्वल होते, त्यांनाच "द्रष्टा" म्हणता येईल. नुसता ’नेता’ होणेच कर्मकठीण आहे "द्रष्टा" होणे तर दुरच राहो. मात्र ही चार व्यक्तीमत्वे उपजतच द्रष्टेपण घेउन आली होती असे म्हंटल्यास वावगे ठरु नये.

आणि त्यांच्याकडे द्रष्टेपण होतं म्हणुनच ते समर्थ नेतृत्व करु शकले. शेकडो वर्षांनंतरचा विचार करुन त्यांनी आपली धोरणे आखली ती राबवली, कदाचित म्हणुनच तत्कालीन समाज अथवा त्या नंतरच्या पिढ्या तग धरुन राहु शकल्या. अन्यथा बाबिलोनियन, माया, पारसिक, रोमन, ग्रीक, इजिप्शीयन अश्या प्रचंड मोठ्या संस्कृतींच्या वा साम्राज्यांच्या यादित भारत किंवा हिंदु संस्कृतीचे नाव आले असते. या चौघांपैकी दक्षीणेतील द्रष्ट्याने तर उभ्या हिंदु धर्मावर हिमालया इतके कधीहि न फिटणारे उपकार करुन ठेवले आहेत. तर पश्चीमेकडील द्रष्टा तर ’हिंद्दुहृदयसम्राट’ बनला असे कार्य करुन गेलाय.

"चारीत्र्य" हे तर यांच महत्वाचं बलस्थान. माया-मदिरा-स्त्री यांच्या आहारी ते कधीच गेले नाहित. या चार जणांतील तिघे तर आजन्म ब्रह्मचारी राहिले तर चौथा संसारी असला तरी आपल्या संसाराला आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त स्थान त्याने कधीच दिले नाहि. आणि अगदी शत्रुनेही "स्त्री-दाक्षीण्य" या गुणाबाबत त्यावरुन आपले सर्वस्व ओवाळुन टाकावे इतकी शुचिता त्याच्याकडे होती.

वरील पूर्ण लेखामधुन "ते" चौघे कोण हे सुज्ञांच्या लक्षात आलेही असेल. मात्र त्यांच्या कालखंडानुसार मी त्यांची नावे प्रकट करतो - "आर्य चाणक्य, आदि शंकराचार्य, छत्रपति शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद" वरील प्रत्येक गोष्ट त्यांच्या बाबत चपखल बसते.

तक्षशीला गुरुकुल असो, जिजाऊसाहेब असोत अथवा रामकृष्ण परमहंस असोत यांचे शिष्यत्व पत्करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि नुसतं पेलुन फायदा नाहिये तर त्यावर आपल्या कार्याची प्रत्युंचा देखिल चढवता आली पाहिजे.

मुळात भारतभू हि पुण्यभूमी असल्याने असे सुपुत्र तिच्या पोती जन्माला आले. आणि ते केवळ भारतभुमीचे सदभाग्य नसुन या चौघांचेही सुदैव आहे असेच म्हणावे लागेल कारण राष्ट्रापेक्षा कोणीचि मोठा नसतो हीच त्यांची शिकवण आहे. तरीही त्यांचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे. ज्याला ’भारत’ समजुन घ्ययचा असेल त्याने या चौघांचे चरीत्र समजुन घेण्याचा प्रयत्न करावा. कारण ह्या चौघांच्या चरीत्राचा एल लक्षांश अर्थ जरी समजला आणि त्या समजलेल्या चरीत्राच्या शतांशा इतकाहि त्यांछा किमान एक गुण आपण आपल्यात उतरवु शकलो तरी ’भारत’ समजला असे म्हणायला हरकत नाहि. नुसते ’मेरा भारत महान!’ असे वर्षातुन दोनदा म्हणायच आणि मग आपल्या कृतीने आपल्या देशाला कमीपणा येईल असे वागायचे याला भारत समजला असे नाहि म्हणता येत.

चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. यातले दोन जण "योद्धा संन्यासी" होते, एक "महागुरु" होता आणि एक जण "श्रीमंत योगी" होता. ’राजयोग आणि कर्मयोग’ यांच अजब मिश्रण त्यांच्या व्यक्तीमत्वात होतं. यांनी ठरवलं असतं तर जगातली सर्व सुखं त्यांच्या पायाशी सहज आली असती. मात्र यांनी ’सोन्याचे पलंग’ वापरल्याचं कोणी ऐकले नाहिये. त्यांनी कधी कोणाचे वाईट केले नाहि. मात्र आपल्या मातृभूमीवर होणारे अत्याचार थांबवुन तिला संपन्न करण्यासाठी शक्य ते उपाय योजल्यांच दिसतं थोडक्यात या चौघांना "आचरल्यास" भारत महासत्ता होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे.एक दिवस भारताच्या महसत्तेचा तारा क्षीतीजावर पुन: उगवल्याशिवाय नाहि राहणार.


- सौरभ वैशंपायन.