Saturday, May 19, 2007

पाऊस

पाऊस सरसरुन पडतो,
गंध मातीचा दरवळतो,
भिजवुन धरित्री सारी,
नभ मल्हार रागही गातो. -१

उभी इंद्रधनुची कमान,
मृगाचे स्वागत करतो,
हिरव्या मखमाली संगे,
थेंबांचे तोरण धरतो. -२

दाही दिशा ओलावुन,
वाराही भरारा फ़िरतो,
पडदे मेघांचे साराया,
नभात रवीही झुरतो. -३

क्षितीजांच्या रेषांवरती,
पसरते दुरवर लाली,
उच्छ्वास टाकुनि धरणी,
मग अलगद हसते गाली. -४

त्या ओल्या वळणांवरुनी,
मीही अलगद वळतो,
मग सरते कातरवेळ,
तो मित्रहि अखेर ढळतो. -५

मित्रही ढळला म्हणुनी,
जीव असा हुरहुरतो,
होतात अंधुक क्षितीजे,
नभ धरेत या विरघळतो. -६


- सौरभ वैशंपायन.

Thursday, May 3, 2007

परित्राण




थरथरे भूमी सारी, क्षणी कोसळे आकाश,
लागे सुर्याला ग्रहण झाकोळला प्रकाश. - १

धन्य झाले विजापूर, उभा राहीला अफ़झल,
प्रार्थती शिवास सगळे, पचवावे हलाहल. -२

बुत्शकिन मैं गाझी, घुमला आवाज करडा,
फुटली भवानी घावात, झाला स्वप्नांचा चुरडा. -३

काळीज फाटे जिजाऊचे, दु:खे आक्रंदली धरणी,
जीव जपुन रे कान्हा, दुष्ट कंसाची करणी. -४

छळविला पिता याने,मारीला फसवुनि भ्राता,
फोडल्या लेण्या नी राऊळे कोणी उरला न त्राता. -५

गर्दीस गनीम मिळवा तुला स्वराज्याची आण,
राम तूच कृष्ण तूच करी त्वरे परित्राण. -६

भेट ठरली प्रतापी सरे वेळ सावकाश,
पसरले बाहु असुराचे उलगडे यम-पाश. - ७

हिरण्यासी अधांतरी नरसिंह जैसा फाडे,
तैसा फाटला अफ़झल, उडले रुधिर शिंतोडे. - ८

शांत झाला शिव-नृप, अग्नि अंतरीचा विझे,
आंदोळली पृथ्वी सारी, देई झुगारुन ओझे. -९


- सौरभ वैशंपायन.

१८५७

सज्ज रणांगण,
वाजे पडघम,
सुर्य उगवला,
छेदाया तम - !!धृ!!


वेळे आधीच वाजे डंका,
मंगल अग्नि जाळी लंका,
क्षण एकातच पेटे पाणी,
बराकपुरीची हीच कहाणी - १


वीरांगनेची ऐका कीर्ति,
मांड टाकली घोड्यावरती,
श्वास थांबती नजरा फिरल्या,
हाय,परी वेदनाची उरल्या. - २


लंदन तक चलेगी तेग,
गर्जु लागला बहादुर एक,
पायी श्रुंखला हाती बेडी,
वंशही चिरडी धाड गिधाडी. - ३


’षडरीपू’ पाठी अपुरी सेना,
काल्पी जिंकुनी तृषा शमेना,
फितुरीत ते फसले तात्या,
विझल्या आशा होत्या नव्हत्या. - ४


उठला जो-तो शस्त्रे परजत,
फिरती पाती छकले शत-शत,
वाहु लगल्या शोणित गंगा,
भिडु लागली माती अंगा. - ५


चळ्चळ कापे अरीसेना ऐशी,
लढली दिल्ली लढली झाशी,
गर्जुनी सिंह जागवी जणु वन,
असेच लढले सन सत्तावन. - ६


- सौरभ वैशंपायन.