Wednesday, April 11, 2007

मी - एक शब्द!

वेचता वेचता कधी,
शब्द असे सांडुन जातात,
लाडे लाडे बिलगतात,
कधी मधेच भांडुन जातात. - १

शब्द कधी मधेच,
अचानक खुशीत येतात,
पाठीवरती थाप मारुन,
अलगद मला कुशीत घेतात. - २

कधी शब्द फ़ुरंगटुन,
गाल फ़ुगवुन बसतात,
अन पुढच्याच क्षणी,
निष्पाप मुलासारखे हसतात. - ३

असाच एखादा शब्द,
ओळी मधुन हरवतो,
माझ्याच मागे लपुन,
मला जग भर फ़िरवतो. - ४

नि:शब्द शांती नंतर,
शब्दांचच वादळ येतं,
विखुरलेले विचार सारे,
क्षणार्धात पोटात घेतं. - ५

उंच उंच जाउन शब्द,
उर भरुन वारा पितात
श्रावणातले पाऊस थेंब,
स्वत:हून टिपुन घेतात. - ६

शब्द कधी तलवार होतात,
शब्दच होतात माझी ढाल
शब्द कधी गाणे बनतात
ठेक्यावरती धरतात ताल. - ७

शब्द माझे स्वत:भोवती,
गिरकी घेउन फ़िरतात
ओघळणारे अश्रु बनुन,
कधी डोळ्यांमधे भरतात. - ८

-सौरभ वैशंपायन.

No comments: